निकाल अनपेक्षित; बाबरी मशिदीचा विध्वंस अचानक घडला नव्हता

  • माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोलेंचे प्रतिपादन
  • “भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असल्याचे जाणवतेय. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत आहे. परंतु, तो कमकुवत होताना त्याचे रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडत आहेत.”

विशेष प्रतिनिधी

पुणे : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात आलेला न्यायालयाचा निकाल हा आपल्याला अपेक्षित नव्हता, असे माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी सांगितले. बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा गोडबोले हे केंद्रीय गृह सचिव होते. बाबरी मशीद विध्वंस अचानक घडलेली गोष्ट नाही. त्यासाठी काही काळ पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती, असेही गोडबोले यांनी स्पष्ट केले.

गोडबोले म्हणले, “आजच्या निकालाविरोधात केंद्र सरकारने उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील जायला हवे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेलल्या घटनांवरून भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असल्याचे मला जाणवत आहे. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत असून तो कमकुवत होत असताना त्याचे रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडतोय.”

निकाल देताना न्यायालयाने बाबरी मशिद पाडली जाणे हा कारस्थानाचा भाग नव्हता असं म्हटलंय. मात्र आपल्याला तसं वाटत नाही, असे ते म्हणाले. गोडबोले म्हणाले, “बाबरी मशिद पाडली जाणं ही उत्स्फूर्त घटना नव्हती तर त्यासाठी आधीपासूनच पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. बाबरी प्रकरणाचा निकाल आल्यानंतर काशी, मथुरा आणि इतर ठिकाणच्या धार्मिक स्थळांबद्दलची मागणीही आक्रमक पद्धतीने होऊ लागलीय. ती पाहता आपण हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येतेय.”

हिंदू राष्ट्र होणे हे ज्या देशात २०% टक्के जनता अल्पसंख्यांक आहे त्या देशासाठी अडचणीचे ठरू शकते. तसे झाल्यास ज्या राज्यांमध्ये अल्पसंख्यांक अधिक आहेत अशा पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधूनही अशाचप्रकाराच्या मागण्या पुढे येऊ शकतात, अशी भीती गोडबोले यांनी व्यक्त केली.

भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्यपद्धतीवर रचण्यात आला आहे. त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडतायत. ज्या पक्षांनी देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली होती ते पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व लोकांमध्ये धर्मनिरपेक्षतेचं महत्व पटवून देण्यात कमी पडतंय असंही माधव गोडबोले यांनी म्हटलंय. आता जनभावना ही धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करण्याकडे आहे. मात्र जनमानस तयार करणं, लोकांची मतं घडवणं हे राजकीय नेतृत्वाच काम असल्याचेही गोडबोले यांनी म्हटलंय.

माधव गोडबोले हे बाबरी मशिदीचा विध्वंस झाला तेव्हा गृह सचिव असल्याने त्यांच्याकडे सर्व घटना आणि घडामोडींची माहिती पोहचत होती आणि त्यावेळची निर्णय प्रक्रियाही त्यांनी जवळून पाहिली. निवृत्तीनंतर गोडबोले यांनी पुस्तके आणि लेखांच्या माध्यमातून रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा विध्वंस याबद्दल भाष्य केले. भारताची राजकीय प्रक्रिया पुन्हा सुरळीत व्हावी यासाठी धर्म आणि राजकारण यांची फारकत व्हायला हवी असे गोडबोलेंचे मत आहे. त्यासाठी देशाच्या संसदेत कायदा व्हायला हवा, असे मतही गोडबोले यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*