राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या बदल्या केल्या; शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी त्या रद्द करून दाखविल्या…!!

  • शिवसेना – राष्ट्रवादी वादात पोलिस बदल्यांचा पोरखेळ
  • शरद पवारांनी बैठक घेऊनही ठाकरे – पवार सरकारमधील मतभेदांचा चव्हाटा वाढतोय

वृत्तसंस्था

मुंबई : राज्याचे राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताहेत. चारच दिवसांत शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बदल्या रद्द करताहेत. शरद पवारांनी बैठक घेऊनही ठाकरे – पवार सरकारमधील मतभेदाचा चव्हाटा विस्तारत चाललाय. कोरोनाच्या महासंकटकाळात तीन पक्षांच्या सरकारने एकजूटीने काम करण्याची अपेक्षा असताना हे घडते आहे.

मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसांत रद्द करण्याचा अजब कारभार महाविकासआघाडीने करून दाखवलाय. २ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. मात्र ४ दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.

बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश रद्द केल्याचे आदेश काढण्यात आलेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा दणका दिल्याचे मानले जात आहे. सरकारमधील हा गोंधळ समोर आल्यानंतर सहाजिकच विरोधक टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.

शासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. मात्र आयपीएस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस दलात संभ्रमाचं वातावरण आहे. अशातच ४ दिवसात बदल्यांचे आदेश रद्द केल्याने सरकारप्रमाणे पोलीस दलातही गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी कोरोनाच्या कारणामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका आयुक्तांच्या बदल्या शासनाने एकाच वेळी करून गोंधळ घातला होता. त्यातच नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदलीही रद्द करण्यात आली होती. आता या बदल्यांबाबतचा आणखी एक गोंधळ समोर आलाय. महाविकास आघाडी सरकारचे तीन पक्षांचे सरकार चालवताना सरकारमधील हा गोंधळ वारंवार समोर येतोय. हा गोंधळ वाढत गेला तर या सरकारचं काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*