राजेश टोपे यांच्या बैठकीतच शेतकऱ्याचे विषप्राशन

  • सावकाराने जमीन हडपली परंतु शेतकऱ्याच्या तक्रारीची पोलिस, प्रशासनाकडून दखल नाही

विशेष प्रतिनिधी

जालना : जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विलास राठोड असे या शेतकऱ्याचे नाव असून तो सेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी आहे.

सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनेनन्तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस लावण्यात आला आहे.

राजेश टोपे यांच्यासमोरच घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या शेतकऱ्याने ज्या कारणासाठी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत सदर शेतकऱ्याला न्याय मिळणार का, हे पाहावं लागेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*