घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का?; दानवेंचा खोचक प्रश्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

“देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना?,” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे. त्यांचं दुख समजून घेतलं पाहिजे. हे आपलं माझं कुटूंब माझी जबाबदारी आहे”. “आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा.

आता लोक मोबाइल उघडून पाहतो आणि खिशात ठेवतो,” असा टोला त्यांनी लगावला. “राज्यातील सरकारची स्थिती अमर अकबर अँथनीसारखी आहे. हे सरकार आहे का?सरकार कोण चालवतंय, निर्णय कोण घेतंय कळतंच नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*