मुंबईतील संचाराचे निर्बंध पवारांनी करून घेतले शिथिल; पण वाढत्या कोरोनावर प्रश्नचिन्ह कायम

… पवारांनी ठाकरेंना कोरोनाशी लढाईची नाही सांगितली युक्ती


मुंबईत दोन किलोमीटर परिघातच संचाराची अट रद्द; तरीही घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवासमुभा देण्याच्या मुंबई पोलिसांच्या अटीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही अट रद्द करवून घेतली. पण त्याच मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांना काही सांगितलेले दिसले नाही.

राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून नागरिकांना घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन किलोमीटर परिघाबाबतच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी नागरिकांना केले, तर दोन किलोमीटर परिघाची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा लॉकडाऊन करणे, मुंबईत घरापासून दोन किलोमीटरच्या आतच प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

मुंबईत रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी, सोशल मीडियातून ‘घराजवळच खरेदी करा, व्यायामासाठी घराजवळील मोकळ्या जागेत जा, असे नवे आवाहन शुक्रवारी केले. तर मुंबईत निर्बंध लागू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतही दोन किमी परिघाची मर्यादा घालण्यात आलेली नाही.

“प्रवासासाठी फक्त दोन किलोमीटर अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रि या उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे.”

– अनिल देशमुख, गृहमंत्री

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*