- संरक्षण धोरणाचा Mode बदलल्याचा प्रत्यत
- मोदींची अचानक लेह – लडाखला भेट, जवांनाशी संवाद
वृत्तसंस्था
लेह : चीनच्या five fingers आणि कथित south China sea विस्तारवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जबरदस्त प्रहार केला. लेह – लडाखच्या अचानक दौऱ्यावर जाऊन मोदींनी बहादूर जवानांशी संवाद साधला. लडाख हिंदूस्थानचे मस्तक आहे. त्याची तुम्ही ढाल आहात, अशा शब्दांत मोदींनी त्यांचे मनोधैर्य वाढविलेच, परंतु, कोणतीही पोकळ चर्चेची गुळमुळीत भाषा न वापरता त्यांनी चीनला नाव न घेता थेट युद्धभूमीवरून कठोर संदेश दिला.
कोणाचे शेजारचा देश गिळंकृत करण्याचे हेतू असतील, तर ते त्याने विसरून जावेत. जगात आता विस्तारवादी धोरणाला किंमतच नाही. विस्तारवादाचे युग संपले आहे. विकायवादाचे युग सुरू झाले आहे. दुनियतले सगळे देश विस्तारवादाच्या विरोधात एकजूटीने ठाम उभे राहिले आहेत, अशा शब्दांत त्यांनी चीनला ठणकावले. चीनसारख्या प्रबळ शत्रूशी सर्व पातळ्यांवर संघर्ष सुरू असताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन थेट चीनी विस्तारवादी धोरणावर प्रहार करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले.
मोदींचा लेह – लडाखचा दौरा सुरू असतानाच चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे नरमाईचे वक्तव्य आले. दोन्ही बाजू चर्चा करत असताना ती बिघडेल, असे पाऊल कोणी उचलू नये, असे ते वक्तव्य होते. परंतु, मोदींच्या जवानांसमोरील भाषणात उगाळून गुळगुळीत झालेली मुत्सद्दी भाषा नव्हती, तर सीमेवरचा जवान ज्या खणखणीत भाषेत शत्रूशी बोलतो तशी कडक भाषा होती.
या भूमीवर शूर वीरच राज्य करू शकतो. दुर्बळाचे ते काम नव्हे. दुर्बळाच्या शांती समझोत्याला कोणी विचारत नाही. पण भारत आता “तसा” उरलेला नाही अशा रोखठोक शब्दांमध्ये त्यांनी देशांतर्गत विरोधकांना आणि देशाबाहेरील शत्रूला सुनावले. मोदींनी राजपुताना रायफल्सची युद्ध घोषणा आणि कवि रामधारी सिंह दिनकर यांच्या स्फूर्तिदायक काव्याचाही उल्लेख केला. मुरलीधर कृष्णाबरोबरच सुदर्शनधारी कृष्णही भारतीयांचा आदर्श आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
जवानांचे मनोधैर्य वाढविणे या बरोबरच भारत संरक्षण धोरणात किती आक्रमक झाला आहे, याचा प्रत्यय मोदींनी जवानांसमोर दिला. याला सर्वाधिक महत्त्व आहे. शत्रूला सडेतोड उत्तर देऊ, ही भारताची नेहमीची दिल्लीतून बोलली जाणारी भाषा होती. पण मोदींनी त्याचा mode बदलून टाकला. जवानांना पूर्ण विश्वासात घेऊन सीमावर्ती भागात त्यांना येणाऱ्या कशा दूर केल्या, कशी पायाभूत सुविधांची कामे वेगाने वाढवली याची तपशीलवार माहिती मोदींनी दिली.
भारतीय जवानांचे धैर्य, शौर्य हिमालयापेक्षा उंच आहे, असे सांगत मोदींनी भारत माता आणि वीर मातांचे स्मरण केले. जवानांविषयी आभार व्यक्त करणारी, त्यांच्या शौर्याचा गौरव करणारी भावपूर्ण भाषा तर मोदींनी वापरलीच पण आपल्या जवानांविषयी भारत सरकारची भावना आणि चीनची त्यांच्या जवानांविषयी चीनी माओवादी कम्युनिस्ट सरकारची भेदभावी वर्तणूक यामधील महत्त्वाचा फरक त्यांनी जगासमोर अधोरेखित करून दाखविला.
१९६२ च्या युद्धातील शूर जवानांच्या शौर्याची आठवण तसेच गलवानच्या शूरवीरांची आठवण, लडाखमधील देशभक्त जवानांना सलाम हे देखील मोदींच्या भाषणाचे वैशिष्ट ठरले.