मातोश्री २ च्या जागाखरेदी चौकशीची संजय निरूपम यांची मागणी

  • अहमद पटेल, संदेसरा बंधूंच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्याशी जुळलेत धागेदोरे
  • मातोश्री २ ची मूळ जागा प्रसिद्ध चित्रकार के. के. हेब्बर यांची
  • उद्धव ठाकरे यांना १० हजार चौरस फुटाची जागा ५.८ कोटींना मिळाली.

वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री २ या बंगल्याचा वेगळा घोटाळा पुढे आला आहे. या बंगल्याची जागा जागा ठाकरे यांनी राजभूषण दीक्षित आणि त्यांच्या बंधूंकडून खरेदी केली. या बंधूंना १४ हजार कोटींच्या अफरा तफरीबद्दल अटक करण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र यातील मुख्य आरोपी संदेसरा बंधू हे फरार आहेत. याच प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांची चौकशी केली होती.

या प्रकरणाचे धागेदोरे आता मातोश्री २ पर्यंत येऊन ठेपले आहेत. आधी शिवसेनेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी ट्विट करून यातील गौडबंगालाची चौकशीची मागणी केली आहे, तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी रिट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुलाशाची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री २ निवासस्थानासाठी ज्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली त्या व्यक्तीची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी सुरू असल्याचे नमूद करत या जमीन व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. निरुपम सध्या काँग्रेस पक्षात एकाकी असून त्यांच्या या दाव्याला आणि मागणीला पक्षातून पाठिंबा मिळण्याची जराही शक्यता दिसत नाही. काँग्रेसमधून दुसऱ्या कुणीही यावर अद्याप भाष्य केलेले नाही.

वांद्रे कलानगर येथे उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य याच वास्तूत होते. या मातोश्री बंगल्याच्या समोरच मातोश्री २ उभारणी करण्यात येत आहे. ही वास्तू जिथे उभारली जात आहे, त्या जमिनीच्या व्यवहारावर निरुपम यांचा आक्षेप आहे.

उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये राजभूषण दीक्षित यांच्याकडून ही जमीन खरेदी केली होती. याच राजभूषण यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. राजभूषण आणि त्यांचे बंधू जगभूषण यांच्यावर गुन्हे दाखल असून अफरा तफरीच्या आरोपाखाली त्यांना कोठडीही झालेली आहे. हाच संदर्भ देत निरुपम यांनी मातोश्री २ साठी झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

‘ईडीने आता मुंबईत लक्ष घातले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना कलानगर-बीकेसीसारख्या मोक्याच्या ठिकाणी १० हजार स्क्वेअर फूट इतका प्लॉट केवळ ५.८ कोटी रुपयांत कसा मिळाला, हा मोठा प्रश्न आहे. या जमिनीची किंमत बाजारभाव लक्षात घेता त्यापेक्षा किमान ७ पट जास्त आहे. म्हणूनच या “व्यवहारावर” शंका निर्माण होते’, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

कलाकारांचे कलानगर

कलानगर ही कलाकारांची वसाहत आहे. व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना कलानगरमध्ये प्लॉट मिळाला होता. त्यावर त्यांनी मातोश्री बंगला बांधला. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोरच प्रसिद्ध चित्रकार के. के. हेब्बार यांना प्लॉट मिळाला त्यावर त्यांनी घर बांधले होते. १९९६ मध्ये हेब्बार यांचे निधन झाल्यानंतर हे घर पत्नी सुशीला आणि तीन मुली रेखा, रजनी आणि राणा हेब्बार यांच्या नावावर झाले. सुशीला यांच्या निधनानंतर हे घर राजभूषण दीक्षित आणि जगभूषण दीक्षित यांच्या प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे घर विकण्यात आले. ऑक्टोबर २०१६ मध्ये या घराची १० हजार चौरसफूट इतकी जागा राजभूषण व जगभूषण यांनी ५.८० कोटी रुपयांना उद्धव ठाकरे यांना विकली. याच व्यवहारावर निरूपम यांचा आक्षेप आहे. मात्र या प्रकरणात निरूपम यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*