महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट; ठाकरे-पवार सरकारची मंत्र्यांच्या गाड्या खरेदीवर दीड कोटींची उधळपट्टी

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत; मात्र मंत्र्यांसाठी ६ नव्या गाड्या खरेदी

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करायची ठाकरे – पवार सरकारची औकात उरलेली नाही… आणि अशा नाजूक आर्थिक परिस्थितीत राज्याच्या मंत्र्यांसाठी मात्र नव्या कोऱ्या गाड्या खरेदीसाठी पैशाची उधळपट्टी सुरू आहे. शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री व अन्य अधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्या खरेदीच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. सहा गाड्या खरेदीसाठी सुमारे दीड कोटी रूपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे.

राज्य सरकारचा पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी २५ लाख रुपये किंमतीचा गाडी खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या मान्यतेनुसार शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांच्यासाठी वाहन खरेदी करता येणार आहे.

एकीकडे कर्मचार्यांना वेतन देणे सरकारला मुश्किल झाले तसेच शाळेतील शिक्षकांनाही काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारकडून कोट्यवधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या वाहन आढावा समितीने विशेष बाब म्हणून या वाहन खरेदीसाठी परवानगी दिली आहे.

यानुसार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण ६ गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या एका इनोव्हा गाडीची किंमत (जीएसटी आणि इतर मिळून) २२ लाख ८३ हजार रुपये आहे.

याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयातील विरोधाभास लक्षात आणून दिला आहे.

कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल असे म्हणतात. तर दुसरीकडे राज्य सरकार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर मंत्र्यांसाठी 6 नव्या गाड्या खरेदीसाठी मान्यता देते. ‘उद्धवा अजब तुझे सरकार!, असे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर केलेली उधळपट्टीबाबत सडकून टीका केली जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*