जयंत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचे लटके समर्थन; फडणवीसांकडे मुद्दे नसल्याचा दावा

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीस यांनी सांगितले पाहिजे”; फडणवीसांना उकसवणारेही वक्तव्य


 विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांचे लटके समर्थन राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. फडणवीसांकडे कोणतेही मुद्दे उरले नसल्याचे घिसेपिटे आरोप जयंत पाटलांनी केले. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी नेमका काय
थिल्लरपणा केला?, हे फडणवीसांनी सांगावे असे त्यांना उकसवणारे वक्तव्यही पाटील यांनी केले

देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असे म्हटले त्यावर आपले काय म्हणणे आहे असे उद्धव ठाकरेंना विचारले असता फडणवीसांनी दिल्लीत जावे म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपचा कोणताही नेता बोलला तर शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे नेते अधिक उत्तरे आणि खुलासे देतात हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला? हे फडणवीसांनी स्पष्ट करावे. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला. असे शब्द वापरणे चुकीचं आहे.”

फडणवीस यांनी काय म्हटले?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटे जाणून घेत असताना अशा प्रकारचे थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*