हाथरस प्रकरणी योगींची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षकांसह तीन अधिकारी निलंबित

  • पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीही होणार

वृत्तसंस्था 

लखनौ : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळा देश हादरला असताना योगी सरकारने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.  एवढेच नाही तर या प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीला मारहाणही झाली. तिची जीभही कापण्यात आली. या सगळ्या घटनेनंतर या तरुणीला दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर या मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार परस्पर केले असा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान हाथरस या ठिकाणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांना कुणालाही भेटू दिलं गेलेलं नाही.

 

 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही गुरुवारी रोखण्यात आलं. राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप आहे. या घटनेचेही पडसाद देशभरात पाहण्यास मिळाले. अनेक ठिकाणी योगी सरकारचा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.

भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनीही योगी सरकारला या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे, अशी विनंती केली आहे. हाथरस प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाल्याचेही मत व्यक्त केलं. आता या प्रकरणी पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, निरीक्षक यांच्यासह इतर काही अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*