हाथरस प्रकरणी सीबीआय चौकशी करणार; पीडितेच्या वडिलांची मागणी मान्य

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश

वृत्तसंस्था 

लखनौ : देशभरात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती योगींनी मान्य करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.

 

“आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांना आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जवाब देखील नोंदवून घेण्यात आलेले आहे.” असे या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी यांनी सांगितले.

यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे  त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

तर, या अगोदर हाथरस घटनेवर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असे म्हटले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*