हाथरसचे राजकारण करून विरोधक जातीय दंगे भडकवू इच्छिताहेत; योगींचा आरोप

  • राजकीय स्वार्थ साधण्याकरता नवनवीन षडयंत्र

वृत्तसंस्था 

लखनौ : हाथरसचे राजकारण करून विरोधक जातीय दंगे भडकवू इच्छिताहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विरोधकांकडून धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिलेले आहेत. तरी विरोधकांकडून आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

“ ज्यांना विकास आवडत नाही ते लोक देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रचंड विरोधानंतर काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचं भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आझाद यांनी सरकारकडे काही मागण्यांही केल्या आहेत. तर, या अगोदर बसपा अध्यक्षा मायावती यांनी योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*