गँगस्टर विकास दुबे ठार; STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक

वृत्तसंस्था

कानपूर : कुख्यात गुंड विकास दुबेचा चकमकीत खात्मा झाला. दुबेला कानपूरला नेताना एसटीएफच्या ताफ्यातील वाहन उलटले. अपघाताचा फायदा घेऊन बंदुकीसह पळ काढणाऱ्या दुबे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. पोलिसांनी अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.

कानपूरच्या अलिकडे १५ किलोमीटरवर विकास दुबेच्या गाडीला अपघात झाला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसाची पिस्तूल खेचून त्याने गोळीबार केला. त्यानंतर पोलिस चकमकीत विकास ठार झाला.

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबे याला काल उज्जैन येथून अटक करण्यात आली. यूपी पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलालाही लखनौहून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे.

विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) कानपूरला नेत होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी महिंद्र Tuv रस्त्यात उलटली. यामध्ये एसटीएफचा पोलीस कर्मचारी जखमी झाला.

पोलिसांच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचं नियोजन असल्याची कबुली विकास दुबे याने दिली होती. घराच्या समोरच पाच पोलिसांचे मृतदेह एकावर एक रचले होते, मात्र ते जाळता आले नाहीत, असं तो म्हणाला.

कोण होता विकास दुबे?

विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.

कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.

विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने २००१ मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*