सणावार आनंदाने साजरे करू या पण, निष्काळजीपणा नको; पंतप्रधान मोदींचे आवाहन

  • लस येत नाही तोवर करोनाशी लढा सुरुच ठेवायचा आहे-मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाशी संवाद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवरात्री, दसरा, ईद, दिवाळी यांच्यासारखे सण आपण आनंदात साजरे करू या. पण निष्काळजीपणा नकोय, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले.

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचे आहे. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयांपर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरू आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असेही मोदी यांनी सांगितले.

कोरोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.  मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरू नका.

भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

आज आपल्या देशात करोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*