काँग्रेसच्या धावपट्टीवर पायलटांचे विमान अखेर ‘क्रॅश’


* उपमुख्यमंत्रीपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी


विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली : राजस्थानमधील सत्तानाट्यामध्ये अखेर सचिन पायलट यांचे विमान काँग्रेसच्या धावपट्टीवर ‘क्रॅश’ झाले आहे. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यासोबतच विश्वेंदर सिंह आणि रमेश मीणा यांचीदेखील मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पायलट यांच्यापुढे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याशिवाय अन्य पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजस्थान सरकारविरोधात सचिन पायलट यांनी कलेले बंड आता पूर्णपणे फसले आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरून अखेर हकालपट्टी करीत गांधी घराण्यास आव्हान देणाऱ्यांचे काय होते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पायलट यांच्यासोबतच त्याचे समर्थक असलेले राज्य मंत्रिमंडळातील मंत्री विश्वेंदर सिंह आणि रमेश मीणा यांचीदेखील हकालपट्टी केली आहे.

त्यासोबतच राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंद सिंग डोटासरा, राजस्थान युवक काँग्रेस अध्यक्षपदी गणेश घुघरा आणि राजस्थान काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी हेमसिंह शेखावत यांची नेमणूकही करण्यात आली आहे. अर्थात, पायलट आणि त्यांच्या समर्थकांची काँग्रेस पक्षातून अद्याप हकालपट्टी केलेली नाही. मात्र, यापुढेही काँग्रेसमध्ये रहायचे असल्यास पायलट यांना दाती त्रृण धरून काँग्रेस हायकमांडची म्हणजेच गांधी कुटुंबाची माफी मागावी लागेल, असा स्पष्ट संदेश काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्रकारपरिषदेत पायलट आणि समर्थकांच्या हकालपट्टीची माहिती दिली. ते म्हणाले, सचिन पायलट यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नेहमीच स्नेह आणि आशीर्वाद दिला आहे. त्यांनी अगदी कमी वयात खासदार, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अशी पदे दिली. मात्र, दुर्देवाने काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपच्या षडयंत्रात पायलट सहभागी झाले आहेत. काँग्रेस हायकमांडने दोन डझनवेळा तरी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था