मुख्यमंत्री शिवसेनेचा; तरी शिवसैनिकांवर ओढवली अर्धनग्न होत आंदोलनाची पाळी


महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभारा विरोधात सेनेचे “चड्डी बनियान” आंदोलन


विशेष प्रतिनिधी

ठाणे : राज्यात चिनी विषाणूच्या साथीने कहर केला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थकारण बिघडले आहे. तरीही महावितरण कंपनी भरमसाठ किमतीची विजबिले पाठवून सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी करत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री कॉंग्रेसचे नितीन राऊत या संदर्भात नागरिकांना दिलासा द्यायला तयार नाहीत. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हेही राज्याचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेण्यास तयार नाहीत. यामुळे व्यथित झालेल्या शिवसैनिकांनी वसई रोड विभागीय वीज कंपनीच्या कार्यालयात अर्धनग्न होत निवेदन दिले.

एवढेच नव्हे तर ‘महावितरण’ने अवाजवी बिलं पाठवून ग्राहकांचा खिसा कापल्याचे सांगत वीजबीले आणि वास्तवातील वीज वापर याचीही पोलखोल केली. शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण , उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

या संदर्भात मिलिंद चव्हाण म्हणाले की, महावितरणने पाठवलेली बिलं आणि सरासरी आकडेवारी यांची पद्धत तुघलकी आहे. ही चूक सुधारून महावितरणने नागरिकांना दिलासा द्यावा. सरासरीच्या नावाखाली होणारी आर्थिक पिळवणूक महावितरणने थांबवावी.

शिवसेनेने महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे –

1) मार्च अखेरीस टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे फेब्रुवारीचे बिल जे मार्च महिन्यात येत होते ते रिडींग न घेतल्याने आले नाही. जूनअखेर पर्यंत अनलॉक होईपर्यंत रिडींग घेतले नाही.

2) फेब्रुवारी ते मे पर्यंत सरासरी बिल दिले. हे सरासरी बिल ज्या महिन्यात वीज कमी वापरली जाते त्या म्हणजे नोव्हेंबर 2019 / डिसेंबर 2019/ जानेवारी 2020 या (हिवाळा) या तीन महिन्यांच्या सरासरीवर नोंदली गेली. आणि ती सरासरी फेब्रुवारी 2020 ते मे 2020 या म्हणजे जास्त वीज वापरली जाते ( उन्हाळा) या चार महिन्यात नोंद केली.

3) उदाहरणार्थ नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2020 मध्ये या तीन महिन्याचे एकंदरीत वीज युनिट पकडून सरासरी 50 युनिट प्रति महिना असे काढलेले युनिट महावितरण यांनी फेब्रुवारी 2020 ते मे 2020 या चार महिन्यासाठी 200 युनिट ( प्रत्येक महिना 50 युनिट )आकारले गेले.

अनलॉक जाहीर झाल्यानंतर जेव्हा मीटर रिडींग घेतले गेले त्यावेळी फेब्रुवारी ते जून अखेरीस म्हणजे 5 महिन्याचे एकूण वापर 600 युनिट असतील तर सरासरी 4 महिन्याचे 200 युनिट वजा केले गेले आणि उर्वरित 400 युनिट वापर जून महिन्याचा वीज वापर दाखवण्यात आला जो पूर्णपणे चुकीचा आहे.

4 ) नोव्हेंबर आणि जानेवारी महिने हिवाळा असल्याने घरातील पंखे / वातानुकूलित यंत्र बंद असतात अशा वेळी वीज कमी वापरली जाते आणि फेब्रुवारी ते मे महिन्यात उन्हाळा असल्याने वीज जास्त वापरले जाते परंतु या वस्तुस्थितीकडे महावितरण यांनी जाणीवपूर्वक काणाडोळा केला आहे.

जर महावितरण यांना योग्य वीज सरासरी आकारणी करायची होती तर मागील फेब्रुवारी 2019 ते मे 2019 या चार महिन्याची सरासरी काढावी किंवा वर्षभरातील 12 महिने पकडून प्रत्येक महिन्याची सरासरी काढणे इष्ट होते.

5) जून 2020 या महिन्याचे जे वीज देयक आहे ते महावितरण यांच्या चुकीच्या धोरणामुळे जास्त दाखवले गेले आहे. जो ग्राहक फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात एकूण 200 युनिट वापरतो तो थेट जून महिन्यात 400 युनिट कसे वापरेल हे सामान्य माणसाच्या नव्हे तर गणिततज्ञ असणार्या महानुभावच्या समजण्याच्या पलीकडचे आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती