चिराग पासवान आणि लोजपा म्हणजे ‘व्होट कटुआ’- प्रकाश जावडेकर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहारमध्ये एनडीए नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली तीन चतुर्थांश बहुमताने सत्तेत येणार आहे. त्यामुळे चिराग पासवान आणि त्यांची लोकजनशक्ती पार्टी केवळ व्होट कटुआ आहे, जनतेने त्यांच्याक़डे लक्ष देऊ नये असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चिराग पासवान यांनी लगाविला आहे.

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे एनडीएतून बाहेर पडले असून स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे आता त्यांचा भाजपा, जदयु अथवा एनडीएशी काहीही संबंध नाही, त्यांचा मार्ग आता वेगळा झाला आहे. प्रचारसभांमध्ये चिराग पासवान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची वारंवार नावे घेऊन ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, भाजपाची बी किंवा सी असी कोणतीही टिम नाही, भाजपा – जदयु – हम – व्हिआयपी हिच एनडीएची टिम आहे आणि तीच टिम बहुमताने सत्तेत येणार आहे.

लोजपा आणि चिराग पासवान यांचे बिहारच्या राजकारणातील स्थान केवळ ‘व्होट कटुआ’ म्हणजेच मते खाणारा पक्ष एवढेच आहे. त्यामुळे एनडीएला सत्तेपासून रोखण्याचे चिराग यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, बिहारमध्ये तीन चतुर्थांश बहुमताने विजयी होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

मात्र, भाजपाने कितीही नाकारले तरीही चिराग ज्या पद्धतीने राजकारण करीत आहेत; ते पाहता त्यांना भाजपाचा छुपा पाठींबा असल्याचा संशय निर्माण होतोच. सध्या बिहारमध्ये अन्य पक्षांपेक्षा भाजपाचेच पारडे जड आहे. एनडीएची सत्ता आली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर सरकारमध्ये यावेळी भाजपाचा वरचष्मा राहिल, असा अंदाज राजकीय पंडित वर्तवित आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*