चीनने एकतर्फी ठरवलेली एलएसी भारताला अमान्य

  • “चीनचे माओवादी पंतप्रधान चऊ एन लाय यांनी ठरवलेली १९५९ सालची एलएसी भारताला अजिबात मान्य नाही”
  • परराष्ट्र मंत्रालयाने ठणकवले

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : लडाखच्या पूर्वभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारत-चीनमध्ये वाद कायम आहे. चीनने पुन्हा एकदा एलएसीवर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताच भारतानेही पलटवार करत अत्यंत कठोर शब्दांत चीनचा दावा फेटाळला.

भारतीय भूभागात अतिक्रमण करणाऱ्या चीनने १९५९ साली ही एकतर्फी नियंत्रण रेषा ठरवली होती. चीन त्याचा दाखला देत आहे. पण भारताने चीनचा हा एकतर्फी दावा मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

“१९५९ साली चीनने एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा भारताने कधीही मान्य केलेली नाही. आमची हीच भूमिका कायम आहे. चीनसह सर्वांनाच ती माहिती आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव स्पष्ट केले.

चीनचे माओवादी पंतप्रधान चऊ एन लाय यांनी ७ नोव्हेंबर १९५९ रोजी भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र पाठवले होते. त्यात प्रस्तावित केलेल्या नियंत्रण रेषेचे चीन पालन करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. त्यावर भारताने चीनची १९५९ सालची एलएसी बद्दलची व्याख्या अजिबात मान्य करणार नाही, असे स्पष्ट केले.

एलएसीवर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी १९९३ साली झालेला करार, १९९६ साली दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण करण्यासंबंधी झालेला करार, २००५ साली भारत-चीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी झालेला करार या सर्व करारांचे दाखले अनुराग श्रीवास्तव यांनी दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*