केंद्राच्या मदतीवरून फडणवीस-ठाकरे यांच्यात जुंपली; पवार खुश

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करू नये : देवेंद्र फडणवीस
  • फडणवीसांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना घराबाहेर काढावे : उद्धव ठाकरे
  • फडणवीस आणि ठाकरे यांच्यात केंद्राच्या मदतीवरून शाब्दिक ‘सामना’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कधीही घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडून सोलापूर जिल्ह्याच्या ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर आले आणि त्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोरदार शाब्दिक चकमक जुंपली. शरद पवारांना अनेक दिवसांपासून जे साध्य करायचे होते ते घडले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा गंभीर प्रश्न थिल्लरबाजीवर उतरला.

मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या पाऊण डझन मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौऱ्याचे फोटो काढून घेतले आणि वेगवेगळ्या भाषेत केंद्र सरकारकडेच मदतीची याचना केली. दुसरीकडे शरद पवारांनीही शेतकऱ्यांची विचारपूस केली पण मदतीसाठी बोटही केंद्र सरकारकडे दाखवले.

या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत जाऊन ठाकरे -पवार सरकारवर टीकेचे आसूड ओढले. सगळी मदत केंद्रानेच करायची तर राज्य सरकार काय करणार?, असा बोचरा सवाल त्यांनी केला. त्यावरून फडणवीसांनी दिल्लीत जाऊन मोदींनाही घराबाहेर काढावे, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करू नये, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले.

हे सर्वपक्षीय नेते ओल्या दुष्काळाची पाहणी करायला शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांचे अश्रू पुसण्याचा आव आणला आणि पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढल्या शरद पवारांनी ओल्या दुष्काळाच्या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीची फेर बांधणी करण्याची चाचपणी करून घेतली या सगळ्यात प्रत्यक्ष शेतकऱ्याला नेमकी किती मदत द्यायला हवी याविषयी एकही नेता वास्तववादी वक्तव्य करणारा निघाला नाही.

अतिवृष्टीचा मोठा फटका हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसला आहे. केंद्राच्या मदतीची अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी केंद्रावर ढकलू नका, असे उद्धव ठाकरेंना सुनावले. या वक्तव्यानंतर ठाकरे – फडणवीस यांच्यात शाब्दिक सामना रंगल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असं म्हटलं आहे यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावे म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करू नये, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले उत्तर?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आले. तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करू नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करते ते महत्वाचे आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*