आत्मनिर्भर भारत संकल्पनेत रघुराम राजन यांना दिसतेय लायसन्स – परमिट राज …!!

  • राजन म्हणतात, “स्वदेशी उत्पादनांना संरक्षण नको”

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी “प्रश्नचिन्ह” उपस्थित केले आहे. या संकल्पनेत त्यांना लायसन्स – परमिट राज दिसतेय.

“केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादात होऊ नयेत,” असे राजन म्हणाले. म्हणजेच स्वदेशी मालाच्या स्पर्धेत परदेशी माल उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे राजन यांनी सूचित केले आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केले. राजन हे यूपीए – काँग्रेस सरकारचे समर्थक आहेत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मुदतवाढीची त्यांची अपेक्ष मोदी सरकारने पूर्ण केली नव्हती.

ते म्हणाले, “यापूर्वीही अशाप्रकारची धोरणे अवलंबली गेली होती. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचे आहे? हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखेच आहे.”

राजन म्हणाले. “जर हा संरक्षणवादाचा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. हे मार्ग अवलंबण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण यापूर्वीच तसे प्रयत्न केले आहेत. यापूर्वी आपल्याकडे लायसन्स परमिट व्यवस्था होती. संरक्षणवादाची ती पद्धत समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरले.”

“भारताला जागतिक उत्पादन यंत्रणेची आवश्यकता आहे आणि याचा अर्थ देशातील उत्पादकांना स्वस्त आयातीचा मार्ग मोकळा असावा. वास्तवाकडे पाहिलं तर भक्कम निर्यातीचा हे आधार बनू शकते,” असंही ते म्हणाले. जागतिक पुरवठा व्यवस्थेचा एक भाग बनण्यासाठी आम्हाला पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सपोर्ट इत्यादी गोष्टी तयार करणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला शुल्क युद्ध सुरू करून चालणार नाही. त्याचा कोणताही फायदा होणार नाही. अनेक देशांनी असा प्रयत्न केला आहे. भारताला शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आपण अन्य देशांना शिक्षण उपलब्ध करून देऊ शकू असंही राजन यांनी नमूद केलं.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*