८० वर्षांचे पवार निघालेत मराठवाड्यात; ६० वर्षांचे मुख्यमंत्री बसलेत घरात…!!

  • शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा
  • पावसामुळे पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ८० वर्षांचे शरद पवार मराठवाड्याच्या दौर्‍यावर निघाले आहेत. शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत, तर ६० वर्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत.

महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अशा स्थितीत ते मात्र घरात बसून महाराष्ट्राच्या नकाशावर पूरस्थितीची पाहणी करत आहेत. आंध्र ओडिशा आणि तेलंगणाला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या. हवाई दौरे काढले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस नितेश राणे यांनीही ही या मुद्द्यावरून टीका करून झाली. आता ८० वर्षांचे पवार दौरा करून मुख्यमंत्र्यांपुढे उदाहरण घालून देत आहेत. यातून तरी मुख्यमंत्री शिकून घराबाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.

शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. १९ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

घरात बसून मदतीचे आदेश

“राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला सांगितले. अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे त्यांनी निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*