सोनियांच्या बैठकीला उद्धव यांची दांडी?; केजरीवालांचा नकार, विजयन यांना निमंत्रणच नाही

  • मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया – ममता हातमिळवणी
  • सोनिया गांधींनी बोलावली काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हातमिळवणी केली आहे. पण ही हातमिळवणी फारशी फलद्रूप होण्याची शक्यता नाही. कारण भाजप विरोधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे दांडी मारण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवालांनी नकार दिला आहे. पिनराई विजयन यांना निमंत्रणच नाही.

मोदी सरकारला घेरण्यासाठी भाजपा सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे. जीएसटी, करोना संकटामुळे राज्यांचे आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर सोनिया गांधी बैठकीत चर्चा करणार आहेत. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही बैठक होणार आहे.

गुरुवारी जीएसटी काऊन्सिलची बैठक पार पडणार असून त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. सर्व राज्यांचे अर्थमंत्री या जीएसटी काऊन्सिलचा भाग आहेत. या बैठकीत विरोधी पक्षातील मुख्यमंत्री १४% जीएसटी भरपाईची मागणी करण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी तसेच इतर विषयांवर केंद्र सरकारविरोधात भक्कमपणे उभं राहत एकत्र लढणं हा बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत दोन वेळा केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी यासाठी पत्र लिहिलं आहे. मात्र केंद्र सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. सुरक्षेचे सर्व उपाय करत जेईई आणि नीट परीक्षा होणार असल्याचं केंद्राच म्हणणं आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरही चर्चा होईल.

या बैठकीत काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनाही आमंत्रित केले जाणार होते, मात्र काँग्रेसचा विरोध असल्याने निर्णय मागे घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*