- मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची माहिती
- दाऊद गँगच्या फोनच्या संशयातून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा टाईट; मंत्री अनिल परब यांची माहिती
वृत्तसंस्था
मुंबई : सुशांत प्रकरणाच्या ऐन भरात बॉलिवूड – ड्रग्ज कनेक्शन उघड होत असतानाच “मातोश्री”वर दाऊद गँगचा “निनावी” फोन आला. दाऊद गँगचा हस्तक असल्याचे त्याने सांगितले. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
मात्र, दाऊद गँगच्या या निनावी कॉलची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांची सुरक्षा टाईट केली अाहे. पोलीस या कॉलच्या डिटेल्स सखोल तपास करत आहेत. मात्र अद्याप तपशील हाती आलेले नाहीत.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर राहुन सरकारचे दैनंदिन संचालन करीत असताना मातोश्रीची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची अाहे. मुंबई पोलिस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेत अाहेत. मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आढावा घेण्यात आलेला असल्याचेही मंत्री अनिल परब यांनी सांगितले. दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती परब यांनी दिली आहे.
दाऊद गँगच्या या निनावी फोनच्या गंभीर घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा टाईट करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नुकतेच नाशिकहून बदली झालेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या गंभीर घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त मातोश्री बाहेर पडले आहेत.
मातोश्रीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त
मुंबई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मातोश्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवासस्थानाबाहेर पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली असून अजून पोलीस कुमक बोलवण्यात येणार आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. आता हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे. जर कोणी तसा खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.
कडक कारवाई करणार : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मी मंत्री आहे. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. जगाच्या पाठीवर मातोश्रीला हात लावणारा जन्माला यायचा आहे. त्यामुळे यातून कोणीही पुढे आला तरी त्याची हयगय करणार नाही, असा गंभीर इशारा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.