सुशांत प्रकरणी पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही; पण सीबीआय चौकशीला विरोधही नाही; शरद पवारांची धक्कादायक प्रतिक्रिया

  • “सुशांतवर मीडियात चर्चा पण माझ्याच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांकडे मीडियाचे दुर्लक्ष”; पवारांची दुसरी धक्कादायक खंत

वृत्तसंस्था

मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी त्याच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही, पण सीबीआयला चौकशी करायची असेल तर विरोधही नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

सुशांत प्रकरणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले.

पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंबंधी विचारण्यात आले असता माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. तसेच ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? असे विचारण्यात आले असता यामागे नेमका काय हेतू आहे हे मी सांगू शकत नाही असे पवारांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*