“सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण वाढतोय”
वृत्तसंस्था
जालना : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपवर आरोप होत आहे. हे प्रकरण भाजप विरोधकांच्याच अंगलट येईल, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रविवारी नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. या नंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतीत आम्हाला कोणताही ठोस दावा करायचा नाही.
मात्र, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सीबीआय चौकशी करून सत्य लोकांसमोर आणावे. ही चौकशी होऊ नये असे कुणाला वाटत असेल तर मग संशय घ्यायला जागा आहे. या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नाही. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक भाजपवर आरोप करत असून ही गोष्ट त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.”
तत्पूर्वी आज काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. याप्रकरणात सीबीआयकडून सुशांतचा मित्र संदीप सिंह याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
संदीप सिंहची भाजपशी जवळीक आहे. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीशी २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.