“चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५००० चौरस मैल भूमी चीनने बळकावली, ती परत केलेली नाही”
विशेष प्रतिनिधी
सातारा : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी दररोज चीनच्या आक्रस्ताळेपणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करताहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये, असे त्यांनी सुनावले.
पवार म्हणाले, “१९६२ च्या युद्धानंतर चीनने भारताची ४५ हजार चौरस मैल भूमी बळकावली आहे. ती अजून त्यांनी भारताला परत दिलेली नाही. ही वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आता नव्याने सीमेवरील जमीन चीनने ताब्यात घेतली आहे किंवा नाही याची मला माहिती नाही. पण प्रश्न विचारताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी राजकारण करू नये, असे माझे मत आहे.”
लडाखमध्ये १५ जूनच्या संघर्षानंतर चीनने भारताची जमीन ताब्यात घेतल्याचा दावा करत सोनिया आणि राहुल गांधी रोज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर रोज प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर काँग्रेस – भाजप राजकीय संघर्ष पेटला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
सर्वपक्षीय बैठकीतही पवारांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अशाच आशयाचे मत व्यक्त करून त्या दोन्ही नेत्यांना सुनावले होते.