सीमेवरचे मोक्याचे रस्ते, पूल, हवाई तळ उभारणी; भारताची वाढती क्षमता हीच चीनची खरी पोटदुखी


  • पायाभूत सुविधांच्या कामात अडथळे आणण्यासाठी चिनी सैन्याच्या कुरापती
  • अक्साई चीन हातचा जाण्याची चीनला भीती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लडाखच्या सीमा भागात भारत वेगाने रस्ते, पूल, हवाई तळ या पायाभूत सुविधा निर्माण करतोय. मोक्याच्या जागांवर सक्षम तळ उभारतोय. भारताची प्रतिकाराची ताकद वाढतीय हीच खरी चीनची पोटदुखी आहे. त्यातूनच आधी डोकलाम आणि आताच्या गालवन सारखे संघर्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याच संदर्भात कालच्या सर्वपक्षीय बैठकीत सूचक वक्तव्य केले होते. जिथे कधी कोणी यायला अडवत नव्हते, तिथे आता पावला पावलावर भारतीय जवान आडवतायत आणि घुसखोरी रोखताहेत, हे ते विधान होते. भारताच्या वाढत्या क्षमतेचे ते द्योतक होते. पर्यावरणासंबंधीच्या सर्व फाइल्स क्लीअर करून मोदी सरकारने मोक्याच्या तळांवर पोहोचणाऱ्या ६६ रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिली. त्यातील बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. बाकीची कामे वेग घेत आहेत.

लष्करी ताकदीने आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय नियमांना आम्ही भीक घालत नाही.आम्ही सांगू आणि ठरवू तीच पूर्व दिशा, या चीनच्या घमेंडीला भारतीय सैन्याकडून खणखणीत उत्तर मिळतेय. त्यातूनच गालवनचा हिंसक संघर्ष उद्भवला.

गालवन खोऱ्याप्रमाणेच हजारो किलोमीटरच्या सीमेवर चीनला आव्हान देण्याची भारताची क्षमता आणि इच्छाशक्ती विकसित झाली आहे. वाटेल तशी घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना इंच इंच भूमीवर भारतीय सैन्याशी भिडावे लागत आहे.

गलवान खोऱ्यात चीनने आक्रमक पवित्रा घेण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीतून भारत आपणास आव्हान देईल असे वाटते, तिथे चीन ही कामे बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. घुसखोरी केली जाते. भारतीय प्रदेशावर दावा सांगितला जातो. सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या गलवान खोऱ्यातील संघर्ष हा त्याचाच एक भाग आहे. मारिया शकील या पत्रकाराने ट्विट करून भारताच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामात कसा वेग आला आहे याची तुलनात्मक आकडेवारी दिली आहे. चीनच्या पोटदुखीचे नेमके निदान या आकडेवारीतून होते.

लडाखमधील या क्षेत्रावर १९६२ च्या युद्धापासून वर्चस्व ठेवण्यासाठी चीन धडपडत आहे. विशिष्ट ठिकाणे हेरून सीमेवर नव्या कुरापती काढण्याचा मार्ग त्याने अवलंबला. चिनी घुसखोरीचा लष्करी तज्ज्ञांकडून दिला जाणारा दाखला लक्षात घ्यायला हवा. चीन दहा पावले आतमध्ये शिरतो आणि चर्चेवेळी पाच पावले मागे घेतो. म्हणजे एकतर तो काही भाग गिळंकृत करतो नाही तर संबंधित भू-भाग वादग्रस्त ठरवून आपल्या सैन्याला दूर ठेवण्याची खेळी करतो.

चीनच्या पश्चिमी लष्करी मुख्यालयावर भारतालगतच्या सीमा प्रदेशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. चेंगडू येथे असणारे हे मुख्यालय भारताला समोर ठेवून नियोजन करते. पर्वतीय युद्धतंत्रात लष्कराला पारंगत करण्यावर भर दिला गेला. लष्कराच्या जलद हालचालींसाठी चीनने सीमावर्ती भागात रेल्वे, महामार्ग, हवाई तळ, पुरवठा केंद्र आदींची व्यापक प्रमाणात उभारणी केली.

दुसरीकडे, भारताने चीनच्या सीमेलगत सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या एकूण ७३ रस्ते बांधणीचे नियोजन केले. त्यातील अति उंच प्रदेशातील ३४१७ किलोमीटरच्या ६१ रस्त्यांची बांधणी, नूतनीकरण, सक्षमीकरणाची जबाबदारी सीमा रस्ते संघटनेकडे (बीआरओ) सोपविली. या कामास बराच विलंब झाला असला तरी २८ पेक्षा अधिक मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. सीमावर्ती भागात रखडलेल्या रेल्वे मार्गाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. सैन्याची जमवाजमव, तोफखाना, तत्सम सामग्रीच्या वहनास रस्ते, हवाई मार्गाने मर्यादा असतात. रेल्वेद्वारे हे काम जलदपणे होते.

सीमावर्ती राज्यात लष्कराच्या ज्या विशेष रेल्वेगाडय़ा धावतात, त्यांचा वेग केवळ ताशी २० ते ३० किलोमीटर आहे. पायाभूत सुविधांचा विकास करून लष्करी तुकडय़ा, दारुगोळा-शस्त्रास्त्रांचा साठा, लष्करी सामग्रीची एका भागातून दुसऱ्या भागात वेगाने वाहतूक होणे गरजेचे असते. त्यामुळे रस्ते बांधकामास प्राधान्य देण्यात आले.

भारत-चीनचा संघर्ष उफाळला तो १४ हजार फूट उंचावरील पूर्व लडाखमधील गालवन नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. काही वर्षांपूर्वी भारताने लेहमधून दौलत बेग ओल्डीकडे जाणारा रस्ता बांधला. तिथे मालवाहू विमाने उतरू शकतील, अशी धावपट्टी तयार केली. या क्षेत्रात काराकोरम खिंडीजवळ भारताची शेवटची चौकी आहे. अक्साई चीनला लागून असणारे हे क्षेत्र आहे. लेह-दौलत बेग ओल्डी मार्गावर आपले प्रभुत्व ठेवण्यासाठी गलवान खोऱ्यातील विशिष्ट भागात चिनी सैन्याला अस्तित्व हवे आहे. या मार्गाच्या मध्यावर गलवान नदीवर भारताने पूल बांधणीचे काम हाती घेतले.

पुलामुळे चीनला या मार्गावर प्रभुत्व ठेवण्यास मर्यादा येईल. शिवाय अक्साई चीनला धोका पोहचेल, असे चीनचे अनुमान आहे. त्यामुळे पूल बांधणीच्या कामास त्याचा विरोध आहे. दोन्ही सैन्यांमध्ये जी धुमश्चक्री उडाली, तेच हे ठिकाण. दौलत बेग ओल्डीपर्यंतचा परिसर सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील धावपट्टीमुळे भारतीय सैन्याची वेगाने जमवाजमव करता येईल. अक्साई चीनवर प्रभुत्व राखता येईल. चीनला ही चिंता सतावत आहे. त्यातून ही कुरापत काढली गेली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था