सिल्वर ओकवर सव्वा दोन तास घालवून, आत्याशी चर्चा करूनही पार्थची नाराजी कायम

  • सुप्रिया सुळेंशी चर्चा; सगळ्या आत्या, काकांशी बोलून पार्थ पवार घेणार निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिल्वर ओकवर सव्वा दोन तास घालवून आणि आत्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करूनही पार्थ पवारांची नाराजी मिटली नसल्याची चर्चा आहे. आता पवार घराण्यातील सर्व काकांशी चर्चा करून पार्थ आपली भूमिका ठरवणार असल्याचे समजते.

‘पार्थ अपरिपक्व आहेत, माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा तीव्र शब्दांत शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्याचे पार्थ पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या पार्थ पवार यांना काल रात्री सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओकवर बोलवून घेतले. ते तिथे सव्वा दोन तास होते. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. शरद पवारांशी मात्र त्यांची थेट चर्चा झाली नसल्याचे समजते. मात्र सिल्वर ओकवरील सव्वा दोन तासांच्या कौटुंबिक राजकीय मुक्कामानंतर १४ – १६ तास उलटून गेलेत. अद्याप पार्थ पवारांची पुढील भूमिका ठरलेली नाही. तसे सांगायला पवार कुटुंबातील कोणी पुढे आलेले नाही.

मात्र याबाबत पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशीही चर्चा करणार आहेत, असे समजते. पार्थ पवार हे आपल्या सर्व काका आणि आत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. पार्थ आपले काका जयंत पवार, श्रीनिवास पवार, अभिजित पवार यांच्याशी आणि सुप्रिया सुळे सोडून अन्य आत्यांशी चर्चा करणार आहेत. सुप्रिया सुळेंशी काल रात्रीच त्यांची चर्चा झाली आहे. आजोबा शरद पवार यांच्या विधानामुळे दुखावले गेलेले पार्थ अद्यापही अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे.

साडेसात वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार हे सिल्व्हर ओकला गेले आणि बंद दाराआड या कुटुंबीयांमध्ये बरीच चर्चा झाली. सव्वा दोन तासानंतर पार्थ पवार बंगल्याबाहेर आले, पण त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

बुधवारी सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती. ती बैठक संपल्यानंतर अजित पवारही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना सिल्व्हर ओकवर बोलावलं होतं. सिल्व्हर ओकवर त्यावेळी शरद पवारही होते. परंतु, पार्थ यांच्याशी थेट चर्चा झाली नसल्याचे समजते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*