सरकार तिघांचं; नाव दोघांचंच?; काँग्रेस भडकली; ठाण्यात बॅनर लावून शिवसेना, राष्ट्रवादीची अब्रू काढली

  • परभणी, मोहोळनंतर ठाण्यात तिघाडीत बिघाडी

वृत्तसंस्था

मुंबई : परभणी, मग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे शिवसेना राष्ट्रवादीवर भडकली असताना आता ठाण्यात या दोन्ही पक्षांवर काँग्रेस खवळली आहे. तिघाडी सरकारमध्ये बिनसत चाललंय. काँग्रेसने तर ठाण्यात बँनर लावून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अब्रुची लक्तरे रस्त्यावर काढली आहेत. ठाकरे – पवार सरकारची वचनपूर्ती म्हणत ठाण्यातील एक बॅनरवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यावरून काँग्रेस मात्र खवळली आहे.

 

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर हे सरकार सत्तेवर आलं असतं का? असा संतप्त सवाल शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी विचारला आहे. सरकार तिघांचं मग नाव फक्त दोघांचे का ? असा सवाल काँग्रेसने या पोस्टरमधून विचारला आहे.

 

शिवसेना-राष्ट्रवादीच्या बॅनर शेजारीच काँग्रेसने हे बॅनर भरचौकाच लावलं असल्याने महाविकास आघाडीतील मतभेद हे ठाण्याच्या चव्हाट्यावर आले आहेत. यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी तुमच्या तीन पक्षांच्या आपापसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळं केलं, अशी टीका केली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातलं अतर्गत राजकारण वारंवार समोर येत आहे. यावर राज्यातील काँग्रेस नेते काँग्रेस अध्यक्षांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून सामनातूनही काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. अशात भाजप सत्ताधाऱ्यांवर निशाणा शोधण्यासाठी टपून असताना ही बॅनरबाजी म्हणजे त्यांच्या हाताता आयतं कोलीत दिल्यासारखं आहे.

परभणीत शिवसेना खासदारांनी थेट राजीनामा देऊन राष्ट्रवादीची जिंतूर बाजार समितीतली हेकडी काढली. मोहोळमध्ये शिवसेना उमेदवाराच्या मुलाने राष्ट्रवादीच्या आमदाराने जात प्रमाणपत्र खोटे दिल्याची पोलखोल केली. आता ठाण्यात काँग्रेसने नंबर लावला.

 

महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबरच सत्तेत सहभागी आहे. याचीच खंत काँग्रेस काही नेत्यांमध्ये असल्याचं वारंवार समोर येत आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या आयडोलॉजीचं काय? असे प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. यावरूनच काहींना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही आहे आणि नवं नेतृत्व निर्माण होऊन द्यायचं नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

 

मागील आठवड्यामध्ये काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करत पत्र प्रपंच केला होता. यावर याआधीच ‘सामना’च्या अग्रलेखातून राऊत यांनी कडवट टीका केली होती. ज्या नेत्यांनी पत्रप्रपंच केला. त्यापैकी काहींना अध्यक्ष व्हावे असं वाटत असावं पण त्यांच्यात एका मध्येही राष्ट्रीय नेतृत्व करावं अशी ताकद आणि कुवत नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*