सगळीकडे सगळे बाजार सुरू; मात्र महाराष्ट्रात मुर्खांचा बाजार सुरू; राज ठाकरेंचा घणाघात

  • जिम सुरू करा; राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?; राज यांचा परखड सवाल

 विशेष प्रतिनिधी

 

मुंबई : केंद्र सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप महाराष्ट्र सरकारने जिम सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी, राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का? सगळीकडे सगळे सुरू झालेय. पण महाराष्ट्रात मुर्खांचा बाजार सुरू आहे, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली.

“केंद्र सरकार सांगतंय की जिम सुरू करा. विमानतळदेखील सुरू करायला सांगितली आहेत. पण राज्य सरकार म्हणतेय की आम्ही असे करणार नाही. मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर निशाणा साधला. “तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात. मी स्वत: टेनिस खेळायला सुरूवात केली आहे. गोल्फ, टेनिस इतकं फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्याच खेळात नाही पण ते सुद्धा बंदच आहे”, या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

“केंद्र सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्व नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करा.” मनसे अध्यक्ष @RajThackeray pic.twitter.com/rtKTbZKOPS

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 11, 2020

 

राज ठाकरे म्हणाले, “बाजार सुरू आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरू आहेत. महाराष्ट्रात मूर्खांचा बाजार सुरू आहे. केंद्र सरकार सांगतंय काही गोष्टी सुरू करा, राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितले, पण राज्य तयार नव्हतं. अशा वेळी असं वाटतं की राज्याला वेगळी अक्कल आहे का? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या”, असा सल्ला त्यांनी जिम चालक आणि मालक यांना दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*