संजय राऊतांवर डॉक्टर्स खवळले; माफी मागण्याची आयएमएची आग्रही मागणी

डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते, असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा डॉक्टर संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत राऊत यांच्याविरुध्द पोलीसांतही तक्रार केली जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते, असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा डॉक्टर संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत राऊत यांच्याविरुध्द पोलीसांतही तक्रार केली जाणार आहे.

संजय राऊत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळते. मी तर नेहमी कम्पाऊंडरकडून औषधे घेतो. डब्ल्यूएचओला काय कळते, सीबीआयसारखेच आहेत ते. इकडून तिकडून माणसं गोळा केलेली असतात. डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणूनच कोरोना जास्त वाढला. असे तारे राऊत यांनी तोडले होते.

याबाबत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनश भोंडवे म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज आपल्या प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळते म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.

राऊत यांच्या विरुध्द पोलीस तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे त्यांच्या निषेधाचे ठराव मंजूर करून ते राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्यसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही आयएमएने स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*