चीनी सैन्याच्या बलिदान, त्यागाला माओवादी सरकार किंमतच देत नाही, या निर्णयामुळे वाढतोय असंतोष
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारत – चीन हिंसक संघर्षात ४० हून अधिक सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारले. जे भारतीय सैनिक लढता लढता मारले गेले त्यांना भारतात शहीद मानले गेले पण चीनने आपल्या मृत सैनिकांची दखलही घेतली नाही. त्यामुळे चीनी सैनिकांमध्ये असंतोषाचे लोण पसरले आहे. हे लोण सैन्यामधून चीनच्या माओवादी कम्युनिस्ट सरकारविरोधातील बंडापर्यंत पोहेचू शकते, अशी शक्यता माजी कम्युनिस्ट नेत्यानेच व्यक्त केली आहे.
गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांसोबत झालेली चकमक आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारला महागात पडत असल्याचं दिसत आहे. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केले. ही माहिती लपवल्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीचे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांमध्ये नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. तसंच ते कोणत्याही क्षणी सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन करू शकतात अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
वॉशिंग्टन पोस्टच्या ओपिनिअनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि चीनच्या सिटीझन पॉवर इनिशिएटिव्हचे अध्यक्ष जियानली यांग यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून पीएलए चीनच्या सत्तेतील मुख्य भाग राहिला आहे. जर देशसेवेत काम करणाऱ्या पीएलए केडरच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये सामील होतील आणि देशाच्या सरकारविरूद्ध बंडखोरी करतील,” असे यांग यांनी म्हटलं आहे.
भारतीय सैनिकांपेक्षा जास्त चीनी सैनिक ठार झाले हे माओवादी कम्युनिस्ट सरकारने मान्य केले तर देशांत अशांतता पसरेल आणि सीपीपीच्या सत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे यांग यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लेखात म्हटले आहे. “पीएलएने आतापर्यंत सीसीपी सरकारसाठी मजबूत आधारस्तंभ म्हणून काम केले आहे. जर पीएलएच्या विद्यमान सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर नाराज असणारे कम्युनिस्ट सदस्य एकत्र आले तर शी यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान देऊ शकतात,” असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना नेमके किती चीनी सैनिक मारले गेल्याचे विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी आपल्याकडे माहिती नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांचा हवाला दिला. यात चीनचे ४० सैनिक ठार केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी ती चुकीची माहिती असल्याचे दुसऱ्या दिवशी सांगितलं,” असंही ते म्हणाले होते.
आठवडाभरानंतरही चीनने आपले किती सैनिक ठार झाले हे सांगितले नाही. परंतु दुसरीकडे भारताने शहीद झालेल्या जवानांची सार्वजनिकरित्या माहिती दिली आणि त्यांना सैन्याचा सन्मानही देण्यात आला. चीनच्या या वागण्याच्या पीएलएच्या अनेक माजी सैनिकांना राग आला आहे आणि त्यांचा राग दिवसेंदिवस वाढतच आहे,” असेही यांग यांनी स्पष्ट लिहिले आहे.