शिवसेना सोबत नसती तरी एकट्या भाजपला १४० जागा मिळाल्या असत्या


  • रामदास आठवले यांचे पवारांना प्रत्युत्तर
  • देशाच्या, राज्याच्या हितासाठी आणि सुप्रिया सुळेंच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी एनडीए सोबत यावे : रामदास आठवले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना सोबत नसती तर भाजपला ४० – ५० जागा मिळाल्या असत्या, या शरद पवारांच्या वक्तव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकटा लढून भाजपला १४० जागा मिळाल्या असत्या असा दावा आठवले यांनी केला. त्यावेळी देखील पाठिंब्यासाठी शरद पवारांना विनंती केली असती, असेही आठवले यांनी सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी शरद पवार यांनी एनडीए सोबत यावे. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेसोबत राहू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवार यांच्यातील चांगल्या संबंधांचा निर्वाळा त्यांनी दिला.

आठवले म्हणाले, “देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात ठाकरे – पवार सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे. सामना पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आले आहे.”

आज भाजपचे सरकार असते तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार. ठाकरे सरकारला कोरोना वर मात करायला अपयश आले असल्याची टीका आठवले यांनी केली.

आठवले म्हणाले, “राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहात असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णय हे राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये.”

२०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जर राज्यात वेगळा लढला असता तर ती सत्तेवर आली असती. भाजपला कमीत कमी १४० जागा मिळाल्या असत्या. त्यावेळी जर आम्हाला जागा कमी पडल्या असत्या तर आम्ही शरद पवार यांनाच विनंती केली असती आणि त्यांना सत्तेत सामील करून घेतले असते, असे आठवले यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती