शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी नवा संघर्ष; राष्ट्रवादीच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेना उमेदवारपुत्राचा आरोप

  • परभणीनंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा नंबर

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी संघर्ष अधिक चिघळतोय. परभणीनंतर संघर्षाचे लोण सोलापूर जिल्ह्यात पोहोचलंय.  मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचे दोन जातीचे दाखले असून त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना तत्कालीन उमेदवाराचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत त्यांनी आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले यावेळी पत्रकार परिषदेत सादर केले.

बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने यांचे कुटुंबीय मागील १०० वर्षापासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केलीय.

आमदार माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून १९८५ साली त्यांनी हा दाखला काढला होता तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला.

याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे.

दरम्यान या आरोपाबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांना विचारले असता, क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करू द्या. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे जातपडताळणी विभाग या तक्रारीची दखल घेतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*