काँग्रेस नेते जागे झाले; पवारांवर आक्षेप घ्यायला लागले

  • भारत-चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित; हे कुणाच्या घरचे काम नाही

विशेष प्रतिनिधि

मुंबई : शरद पवारांनी राहुल गांधींना १९६२ च्या चीन युद्धावरून फटकारल्यावर दोन – तीन दिवसांनी काँग्रेस नेत्यांना जाग यायला सुरवात झाली आहे. काल बाळासाहेब थोरात बोलले. आज पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. राहुल गांधींना शरद पवारांनी उपदेशाचे डोस पाजण्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी आक्षेप घेतला आहे.

“भारत-चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचे काम नाही. त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच. या प्रश्नी आम्ही राजकारण करत नाही. सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडतो आहोत. लोकभावना व्यक्त करणे कोणाला चुकीचे वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे.”असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केले.

पवारांनी नुकतेच राहुल गांधी यांनी चीनप्रश्नी केलेल्या विविध वक्तव्यांचा समाचार घेत इतिहासाचा अभ्यास करत तसेच माहिती घेत टीका करण्याचे सांगत त्यांना सुनावले होते. हे सांगताना पवारांनी इतिहासातील काही प्रसंग आणि आकडेवारीचे दाखलेही दिले होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी आज बोलताना पवारांवर टीका केली आहे.

चव्हाण म्हणाले, की आम्ही सक्षम विरोधी पक्षाचे काम करत आहोत. त्यामुळे जनतेच्या मनातील प्रश्नांवर विचारणा करणारच. लोकभावना व्यक्त करणे कुणाला चुकीचे वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे असे सांगत त्यांनी पवार यांच्या वक्त्तव्यावर आक्षेप घेतला.

पवारांच्या पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांवर वाटेल ती शेरेबाजी करणार पवार त्यावर “मुत्सद्दी” मौन बाळगणार आणि काँग्रेस नेते भाजप विरोधात आक्रमक झाले, की चान्स घेऊन राहुल गांधींवर दुगाण्या झोडणार असले पवारांचे दुटप्पी – तिटप्पी राजकारण आहे. यावर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांनी बोट ठेवले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*