वीज बिलात सवलतीचे “लबाडाघरचे आवतान”; नितीन राऊतांविरोधात भाजप हक्कभंग आणणार

वृत्तसंस्था

मुंबई : वीज बिलात सवलतीची ठाकरे – पवार सरकारची घोषणा “लबाडाघरचे आवतान” ठरली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे. आगामी अधिवेशनात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

‘जनतेला आलेल्या अवास्तव वीज बिलात सवलतीची घोषणा ठाकरे सरकारने केली, पण त्यासाठी लागणारे २ हजार कोटी रुपये देण्यास वित्त विभागाने नकार दिला. हा निर्णय म्हणजे ठाकरे – पवार सरकारचे लबाडाघरचे आवतान ठरला आहे. या फसवणुकीविरोधात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणणार,’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

सरकारचे वीज कंपन्यांशी साटलोटे असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. उर्जामंत्र्यांनी फसवी घोषणा केल्याबद्दल आणि यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय केला जाणार असल्याचं खोटं सांगितल्याबद्दल उर्जामंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या फीबाबतीत राज्य सरकारने जशी फसवणूक केली, तेच सरकारने वीज बिलाबाबतीत केले आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली. ३०० युनिटपर्यंत वीजबिल माफ केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*