लडाखमध्ये चीनला भारताने खणखणीत प्रत्युत्तर दिलेय

मोदींची मन की बात; भारतमातेकडे डोळे वटारून बघाल तर डोळे काढून घेऊ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनला भारताने खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून जनतेला सांगितले.

मोदी म्हणाले, “भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करून पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिले आहे.

जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असे म्हटलेय. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे.”

“करोनाचं संकट वाढते आहे, त्यावर आपण अनेकदा बोललो आहोत. अनेकांना वाटतंय की हे वर्ष कधी संपेल. कुणी म्हणतंय की हे वर्ष शुभ नाही. लोकांना वाटतंय की हे वर्ष लवकर संपावं”, असे सांगून मोदी म्हणाले, “अशा चर्चा का होत आहेत याचा विचार करतो तेव्हा मला हेच वाटतं की करोनाचं संकट हेच यामागचं कारण आहे.

करोनाचं संकट येणार हे आपल्याला सहा-सात महिन्यांपूर्वी कुठे ठाऊक होते? अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळे येऊन गेली. शेजारी देश कुरापती काढतो आहे. तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देतो आहोत. हे वर्ष अशुभ नाही हे लक्षात घ्या. एका वर्षात एक आव्हान येवो किंवा ५० आव्हाने येवोत डगमगून जायचे नाही हे भारताचे वैशिष्ट्य आहे.”

मोदी म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून भारताने अनेक संकटांचा सामना केला आहे. पण २०२० या एकाच वर्षात अनेक संकटांचा सामना आपण केला आहे. मात्र डगमगून जाण्याची गरज नाही. अनेक संकटांचा सामना करत आपल्याला पुढे जायचे आहे. या वर्षातच आपल्याला नवी स्वप्नं पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. मला १३० कोटी भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे. संकट कितीही मोठे असले तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणा देतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*