- “मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; अन्याय सहन करणार नाही; शिवसैनिक म्हणून राहीन”
- उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पदे आणि शिवसैनिकांवरील अन्याय सहन झाला नसल्याने परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.
खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना नाराजीचे खरमरीत पत्र लिहून, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर अन्याय होत असेल, तर माझ्या खासदारकीचा उपयोग काय?, असा परखड सवाल जाधव यांनी विचारला आहे.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमले जातात. सात – आठ महिने पाठपुरावा करूनही शिवसैनिकांची नेमणूक होत नाही. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नाही. तरी एकदा नव्हे दोनदा बाजार समितीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमले जातात आणि शिवसैनिकांवर मात्र अन्याय केला जातो. शिवसैनिक नाराज झाले आहेत, असे उद्विग्न उद्गार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात काढले आहेत.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक अाहे. अन्याय सहन करणारा नाही. परंतु, मी खासदार राहुन शिवसैनिकांना पदे देऊ शकत नसेन तर माझ्या खासदारकीचा उपयोग काय? मला खासदारपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
आज भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेत येऊ इच्छितात. पण आपल्या मूळ शिवसैनिकांनाच मी न्याय मिळवून देऊ शकत नसेन तर नव्याने शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना कसा काय न्याय देऊ शकेन, असा सवालही संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मी शिवसेनेच्या खासदारपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करावा. मी यापुढे शिवसैनिक म्हणून काम करत राहीन, असेही जाधव यांनी पत्रात अखेरीस म्हटले आहे.