मी आदित्यचे नाव घेतले नसताना राऊत खुलासे का देताहेत? नारायण राणे यांचा खोचक सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात मी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. तरीही संजय राऊत खुलासे का करत आहेत?, असा खोचक सवाल खासदार नारायण राणे यांनी केला.

सुशांत प्रकरणाची अनेकांकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. नारायण राणे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या वक्तव्यावरून शंका उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे. तसंच मुंबई पोलीस या प्रकरणाचा दबावाखाली तपास करत असून त्याची हत्याच झाल्याचं राणे म्हणाले.

“मी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. जेव्हा त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तर ते यावर का बोलत आहेत? संजय राऊत प्रतिक्रिया का देत आहेत?,” असा खोचक सवालही त्यांनी केला. मुंबई पोलीस दबावाखाली तपास करत आहेत आणि सीबीआय तपासातून सर्व सत्य समोर येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर अपेक्षा वाढल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतही सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचे राणे म्हणाले होते. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. “१३ जून रोजी रात्री सुशांतच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये महाराष्ट्रातील एक मंत्रीही उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर ते मंत्री त्याच्या घरातून निघून गेले आणि सकाळी सुशांतचा मृतदेह सापडला,” असं राणे म्हणाले होते.

सुशांतच्या घराच्यानजीक असलेल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी रोज मंत्री येतात. ते रोज त्या ठिकाणी येऊन काय करतात? असा सवालही राणे यांनी केला होता. दरम्यान राणे यांनी ते मंत्री कोण याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु पोलीस जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी येतील तेव्हा सर्वाना याची माहिती मिळेल आणि आपण त्या मंत्र्याच्या फोटोसहित पुरावे घेऊन माध्यमांसमोर येणार असल्याचे ते म्हणाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*