मशिदी उघडायच्यात म्हणून इम्तियाज जलील मंदिरे उघडण्याच्या आंदोलनात

  • मंदिर – मशीद राजकारणातून औरंगाबादेत शिवसेना – एमआयएम आमने – सामने
  • हिंदू धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये : खासदार इम्तियाज जलील
  • मंदिरे उघडायला आमचे आम्ही समर्थ : चंद्रकांत खैरे

वृत्तसंस्था

औरंगाबाद : मशिदी उघडायच्या आहेत म्हणून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मंदिरे उघडायच्या राजकारणात उतरले आहेत. हिंदू धर्म कोणाची ठेकेदारी नाही, असा टोला त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना लगावला आहे, त्यावर मंदिरे उघडायला आमचे आम्ही समर्थ आहोत, असे प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.

राज्य सरकारने अनलॉकचा चौथा टप्पा सुरू केला. यात अनेक क्षेत्रांना सुरू करण्याची परवानगी देण्यीत आली आहे. परंतु, मार्च महिन्यापासून बंद असलेल्या धार्मिक स्थळांना अद्याप परवानगी नाही. यावरून एमआयएम आक्रमक झाली आहे. प्रत्यक्षात त्यांना उद्या मशिदी उघडायच्या आहेत. म्हणून इम्तियाज जलील यांनी मंदिरे आणि मशिदी खुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

एमआयएमने सुरू केलेल्या मोहिमेतंर्गत मंदिरे उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती जलील यांनी दिली. या अंतर्गत औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. यासोबतच मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम सुरू होणार असल्याचे जलील म्हणाले.

हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही- इम्तियाज जलील

‘हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचे आहे ते लोक असा वाद घालतात. मी जनतेचा खासदार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत, असे जलील म्हणाले.

जलील पुढे म्हणाले की, ‘राज्यात व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, तिथे कोरोना पसरत नाही. फक्त धार्मिक स्थळांवर कोरोना पसरतो, असे कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?’ असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते ?

जलील यांनी मंदिरे उघडण्याची घोषणा केल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खरै खडकेश्वर मंदिरात गेले. यावेळी माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले की, “आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आम्ही मंदिरे खुली करू. पण, मंदिर उघडे करा हे सांगणारे इम्तियाज जलील कोण? ते राजकारण करत आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली असे त्यांना दाखवून बदनाम करण्याचा डाव आहे. आम्ही सहन करणार नाही.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*