मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट; आरक्षणावर ठाकरे – पवार गंभीर नाहीत

  • “उद्धव ठाकरेंनी ५ मिनिटे मराठा आरक्षणावर बोलून दाखवावे” चंद्रकांत पाटलांची टीकेची झोड

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग ५ मिनिटे बोलून दाखवावे अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही यावेळी पाटील म्हणाले.

खरंतर मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं. मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नसेल तर तो विषय समजून घेण्याची तयारी पाहिजे असा सल्लाही यावेळी बोलताना पाटलांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, ‘कंगनाबद्दलही उद्धव ठाकरे गंभीर नाहीत. त्या विषयाची जबाबदारी संजय राऊतांवर दिली आहे. यश मिळालं तर आपलं आणि अपयश मिळालं तर ते संजय राऊतांचं अशी यांची भूमिका आहे’ अशी गंभीर टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. मराठा संदर्भात संबंधित मंत्री अशोक चव्हाण किंवा वरिष्ठ अधिका-यांनी दिल्लीत ठाणं मांडून बसायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षांची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत.

दरम्यान, पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*