बंगळुरू हिंसाचारप्रकरणी नगरसेविका इरशाद बेगमच्या पतीसह ६० जणांना अटक

  • वादग्रस्त पोस्ट लिहिणाऱ्याचे शिर कलम करण्यास बक्षीस लावणाऱ्या शाहजेब रिझवीलाही अटक

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळुरू हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी बृहन्बंगळुरू नगरपालिकेच्या नगरसेविका इरशाद बेगम यांचे पती कलीम पाशासह आणखी ६० जणांना अटक केली. याबरोबरच आता अटक झालेल्यांची एकूण संख्या २०६ झाली. हिंसाचारात एसडीपीआयच्या देखील ४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले, “काँग्रेसची नजर नगरपालिका निवडणुकीवर आहे. त्यामुळेच काँग्रेस या हिंसाचाराबद्दल मूग गिळून आहेत. कलीम पाशा कर्नाटक काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती आहेत. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोमई गुरुवारी म्हणाले, हिंसाचाराच्या प्रकरणात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हात असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेस आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे नातेवाईक पी. नवीन यांचा प्रक्षोभक संदेश सोशल मीडियावरून पोस्ट झाल्यानंतर मंगळवारी रात्री बंगळुरूच्या डी. जे. हल्ली व के. जी. हल्ली येथे हिंसाचार उसळला होता.

पोस्ट लिहिणाऱ्याचे शिर कलम केल्याचे बक्षीस लावणाऱ्या मेरठमध्ये अटक

उत्तर प्रदेशातील मेरठमधला नेता शाहजेब रिझवी यांनी फेसबुकवर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये रिझवी याने कर्नाटक हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदारांचे नातेवाईक पी. नवीन यांचे शिर कलम करणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी ताबडतोब त्याच्या मुसक्या आवळल्या. हिंसाचार तसेच खुनाची चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*