पार्थचे राष्ट्रवादीत पुनर्वसन हा कौटुंबिक वादावर पडदा की तात्पुरता तह?

  • अजित की सुप्रिया हा मूळ प्रश्न सोडविल्याशिवाय पवार कुटुंबातील वादावर पडदा पडेल?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पार्थ पवारांचे राष्ट्रवादीत पुनर्वसन करून पवारांच्या कुटुंबातील राजकीय वादावर पडदा टाकण्याची राजकीय बातमी आली असली तरी केवळ पार्थचे राजकीय पुनर्वसन करून हा वाद मिटेल का?, या कळीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

कारण राष्ट्रवादीच्या गोटातच “पार्थ तो बहाना है; अजित असल निशाना है”, अशी कुजबूज सुरू आहे. त्यामुळे पार्थच्या पुनर्वसनाने तात्पुरता तह झाला असला तरी सुप्रिया की अजित? हा मूळ प्रश्न शरद पवार जोपर्यंत उघडपणे सोडवत नाहीत, तोपर्यंत कौटुंबिक वादाचे नवेनवे प्रवेश घडत राहणार अशीच राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे.

त्यामुळेच पार्थ पवारप्रकरणी पवार कुटुंबातील वादावर पडलेला पडदा तात्पुरता असल्याचे मानले जात आहे. शरद पवार यांच्या कडवट प्रतिक्रियेनंतर नाराज झालेल्या पार्थची समजूत काढण्यात यश आले असल्याचे सांगितले जाते. यासाठी शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस अजित पवार यांच्या कुटुंबीयांची बैठक झाली. मूळात शरद पवारांनी “अपरिपक्व” आणि “कवडीचीही” किंमत न ठेवलेल्या नातवाने वेगळी भूमिका घेऊ नये, यासाठी पवार कुटुंबीयांना दोन दिवस बैठका घ्याव्या लागल्या. यातच सगळे राजकीय सार आल्याचे मानले जात आहे.

दोन दिवसांच्या बैठकांनंतर आजोबा-नातवाच्या वादावर पडदा टाकल्याचे कळते. आजोबांच्या टीकेमुळे पार्थचे राजकीय भवितव्य कोंडीत सापडले आहे. मात्र, पार्थचे लवकरच पक्षांतर्गत पुनर्वसन केले जाईल, असे ठरल्याचे कळते.

पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांच्या घरी रात्री बैठक झाली. या वेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढल्याचे समजते. या बैठकीला अजित पवार, पार्थच्या आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार आदी हजर होते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पार्थने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पक्षाच्या विरोधात मागणी केल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वातील मतभेद चव्हाट्यावर आले होते.

नाराज पार्थ पवार हे पक्ष व कुटुंबीयांविरोधात जाऊन मोठा निर्णय घेणार अशा चर्चा होत्या. मात्र, सध्या तरी या चर्चांना विराम मिळाला आहे. पार्थच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी नातवाच्या भूमिकेला कवडीची किंमत देत नाही,’ असे जाहीरपणे म्हटले होते. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, आता पार्थ प्रकरणावर पवार कुटुंबीय आणि पक्षातीलसुद्धा कोणीच बोलणार नसल्याचे समजते.

पवार कुटुंबीय पुन्हा मुंबईत

पार्थ यांची नाराजी तसेच इतर मुद्द्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची रात्री उशिरा फोनवर चर्चा झाली, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. वाद निवळल्याने शरद पवार पुण्याहून रविवारी मुंबईत पोहाेचले, तर बारामतीहून अजित पवार आणि कुटुंबीय मुंबईत आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*