परीक्षा नकोचा बालहट्ट पिताश्रींनी मोदींकडे धरला

  • सरासरी गुण देऊन विद्यार्थी पास करा; अंतिम वर्षाच्या परीक्षांविरोधात उद्धव ठाकरेंचे मोदींना पुन्हा साकडे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “परीक्षा नकोतच” हा बालहट्ट पिताश्रींनी पंतप्रधानांकडे पुन्हा धरला. अंतिम वर्षांच्या परीक्षा नकोत. विद्यार्थांना सरासरी गुण देऊन पास करा. ही आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आज लावून धरली.

मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या १० मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या चर्चेत सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे केली.

ठाकरे म्हणाले, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे अव्यावसायिक कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावं. करोनामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार. यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता आहे,”

“वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल,” अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*