- कोरोना संकटात निष्काळजीपणा न करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
- कोणीही देशवासी उपाशी झोपणार नाही
- शेतकऱ्यांना आणि प्रामाणिक करदात्यांना नमन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिवसरात्र मेहनत करणारे देशातील कष्टाळू शेतकरी आणि देशातील प्रामाणिक करदाते यांच्यामुळेच देशातील ८० कोटी गरिबांना आता दिवाळीपर्यंत विनामूल्य धान्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे, असे सांगत पंतप्रधान गरिब कल्याण योजनेस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
पावसाळ्यापासून देशात सण-उत्सवांना प्रारंभ होतो. गुरूपौर्णिमा ते दिवाळी असे सण या कालावधीत असतात. त्यामुळे साहजिकच खर्चामध्ये वाढ झालेली असते. ते ध्यानात घेऊन पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता हि योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे देशातील ८० कोटींपेक्षा जास्त नागरिकांना म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिने विनामूल्य पाच किलो गहू अथवा तांदुळ आणि प्रत्येक कुटुंबास १ किलो चणे विनामूल्य देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहिर केले. त्याचप्रमाणे एक देश, एक रेशन कार्ड योजनेच्या दिशेने अनेक राज्यांना सकारात्मक पाऊले उचलली असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गेल्या तीन महिन्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, गेल्या तीन महिन्यात २० कोटी कुटुबांच्या जनधन खात्यामध्ये ३१ हजार कोटी रूपये थेट जमा झाले. देशातील ९ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८ हजार कोटी रूपये जमा झाले. त्याचप्रमाणे मजुरांना आता त्यांच्या गावातच रोजगार देण्यासाठी ५० हजार कोटी रूपयांच्या पंतप्रधान गरिब कल्याण रोजगार अभियानदेखील वेगवानपणे सुरू असल्याचे ते म्हणाले.
विशेष म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येची तुलना केल्यास अमेरिकेच्या एकुण लोकसंख्येच्या अडिचपट जास्त, ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा १२ पट जास्त आणि युरोपीयन युनियनच्या लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट लोकसंख्येस केंद्र सरकार विनामूल्य धान्य पुरवित असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
योजनेच्या मुदतवाढीसाठी ९० हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. गरजूंना आणि गरिबांना विनामूल्य धान्य देणे शक्य होत आहे, याचे श्रेय दोन वर्गांचे आहे. पहिला वर्ग शेतकरी, जे दिवसरात्र मेहनत करून देशाची धान्याची कोठारे भरण्याचे काम करतात आणि दुसरा वर्ग म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांचा. हे दोन्ही वर्ग आपले कर्तव्य अतिशय इमानेइतबारे पार पाडतात, त्यामुळेच देशातील गरिब वर्ग संकटाचा सामना करू शकत आहे. त्यामुळे देशातील गरिबांसोतच शेतकरी आणि करदाते यांचेही आज आभार मानत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताने वेळीच टाळेबंदी आणि अन्य उपाय केले, त्यामुळे देशात मृत्यूदर अद्यापही कमी आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात नियमांचे पालन काटेकोरपणे होत होते, त्यात अनलॉक – १ पासून काही प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही, त्यामुळे मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार साबणाने हात धुणे याचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. प्रशासनानेही याचे पालन कसे काटेकोरपण होईल, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.