ना आक्रमण, ना भारतीय चौकी ‘त्यांच्या’ ताब्यात! मोदी यांचे ठोस प्रतिपादन; चीनविरोधात सर्व राजकीय पक्षांची एकजुट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या सीमेत कोणाचेही आक्रमण झालेली नाही अथवा आपली एकही चौकी दुसऱ्यांच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आमचे २० शूर जवान हुतात्मा झाले, मात्र भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्य देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ असून आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्वाधिकार सैन्यास देण्यात आले आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला.

भारताच्या सीमेमध्ये कोणाचेही आक्रमण झालेले नाही अथवा भारताची एकही चौकी कोणा दुसऱ्यांच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले शूरवीर २० जवान हुतात्मा झाले, मात्र त्यांनी भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठिशी आहे. भारतीय सैन्यास आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्वाधिकार तर देण्यात आले आहेत, तसेच कुटनितीच्या मार्गाने चीनलाही सडेतोड शब्दात सांगण्यात आले आहे.

चीनद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जे काही घडवले गेले त्याविषयी संपूर्ण देशात संताप असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी सैन्य कारवाई असो अथवा प्रत्युत्तर द्यायचे असो त्यासाठी भारतीय सेना, नौदल आणि हवाईदल सज्ज आहे. भारतीय सैन्यदले विविध ठिकाणी एकाचवेळी कारवाई करण्यास आज सक्षम आहेत. आमच्या एक इंच भूभागाकडेही आज कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, एवढी भारताची क्षमता आज वाढली आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

व्यापार असो, दळणवळण असो अथवा दहशतवादाचा सामना करणे असो यात भारताने कधीही कोणाच्या दबावास भिक घातलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत. गेल्या काही वर्षात सीमारेषेवर पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत असून ते यापुढेही त्याच वेगाने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे सैन्यासाठी अत्याधुनुक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टप, क्षेपणास्त्रप्रणालीवरही विशेष भऱ देऊन सैन्याची ताकद वाढविली आहे. त्यामुळे सीमारेषेवर तैनात भारतीय सैन्याची क्षमता वाढण्यासोबतच अतिशय दुर्गम ठिकाणीदेखील आपले सैनिक अगदी बारिक लक्ष ठेवतात आणि आवश्यक तेथे प्रत्युत्तरही देतात, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

भारत – चीन सीमाप्रश्नी केंद्र सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या प्रारंभी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केंद्र सरकारतर्फे आतापर्यंत झालेल्या चर्चेची व उपायांची माहिती दिली. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे गुप्तचर यंत्रणांना अपयश आले नसल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी सर्व राजकीय पक्षांनी चीनविरोधात केंद्र सरकारसोबत उभे असल्याची ग्वाही दिली.

बैठकीस काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, द्रमुकचे स्टालिन, सुखबीरसिंह बादल, प्रा. रामगोपाल यादव, पिनाकी मिश्रा, डी. राजा, सीताराम येचुरी यांच्यासह २० राजकीय पक्षांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था