- कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
वृत्तसंस्था
मुंबई : मंदिरे सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने (ता. २९) ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलना आगोदर दोन दिवस हे “दार उघड उद्धवा दार उघड” हे आंदोलन होणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली.
सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता आणि देवस्थाने सुरू करा या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे.
या आंदोलनाला भाजप पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, पाटील म्हणाले. तसेच, भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिली.