ठाकरे – पवार सरकारची अनलॉकची रणनीती चुकली; दारू दुकानांना परवानगी आणि जिम बंद…!!

  •  जिम चालू करा; फडणवीसांची मागणी

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरु करु शकतं तर जिम का नाही? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. मात्र लोकांचं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मद्यविक्रीची दुकानं उघडू शकतं तर जिम का नाही? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. मात्र लोकांचं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनी व्हायरसच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे.

आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे, असे सांगतानाच फडणवीस म्हणाले की, आज राज्यातील वाईन शॉप्स उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करू शकत नाही? खरे तर करोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाहीत. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला.

सर्वच क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज खरेतर अनलॉकच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतली पाहिजे, असे आवाहन करून फडणवीस म्हणाले, दुर्दैवाने तसे होताना दिसून येत नाही. केश कर्तनालये ही अन्य राज्यांमध्ये लवकर उघडण्यात आली, महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली.

आज जिम सुरू करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भातल्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. चीनी व्हायरस प्रतिबंधक उपाय करीत आपल्याला आता हळूहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही.

एकतर सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारसी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार, याबाबतचा तपशील सरकारला सादर करून ती क्षेत्र खुली करण्याची विनंती करीत आहेत. असे असताना सुद्धा सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही, ही खरोखरच फारच दुर्दैवाची बाब असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*