मंडल अध्यक्ष ४५ वर्षांचा, तर जिल्हा अध्यक्ष हा ५५ वर्षांचा असला पाहिजे. काही अत्यंत निवडक अपवाद असू शकतील; पण वयोमर्यादेचे पालन झालेच पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिल्ली भाजपच्या नेत्यांना स्पष्टपणे बजावल्याचे समजते.
सागर कारंडे
नवी दिल्ली : निवडणूक लढविण्यासाठी ७५ वर्षांची कमाल अट ठेवल्यापाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाने संघठनात्मक पदांसाठीही कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. मंडल व विधानसभा अध्यक्षांसाठी ४५ वर्षे, तर जिल्हा अध्यक्षांसाठी ५५ वर्षांची लक्ष्मणरेषा निश्चित केली असून त्याची अंमलबजावणी दिल्लीपासून होत आहे.
दिल्ली विधानसभा काबीज करण्यात सतत २०-२२ वर्षे अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली भाजपच्या टीम निवडीची सूत्रे केंद्रीय नेतृत्वाने थेट स्वतःकडेच घेतली आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह आणि भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे दिल्लीची विशेष जबाबदारी सोपविली आहे.
थेट प्रदेश संघटनेच्या निवडीमध्ये केंद्रीय नेतृत्वाने असा “हस्तक्षेप” करण्याचा हा पहिलाच व ‘दुर्मिळ’ प्रसंग आहे. अरूण सिंह आणि विजया रहाटकर यांनी दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीच्या नुकत्याच घेतलेल्या बैठकीत या वयोमर्यादेची कल्पना दिली आहे.
“मंडल अध्यक्ष ४५ वर्षांचा, तर जिल्हा अध्यक्ष हा ५५ वर्षांचा असला पाहिजे. काही अत्यंत निवडक अपवाद असू शकतील; पण वयोमर्यादेचे पालन झालेच पाहिजे,” असे सिंह व रहाटकर यांनी दिल्ली भाजपच्या नेत्यांना स्पष्टपणे बजावल्याचे समजते. त्या बैठकीस दिल्ली भाजपचे नवे अध्यक्ष आदेश कुमार गुप्ता, केंद्रीय मंत्री डॅ. हर्ष वर्धन, सातही खासदार व विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच निवडणूक लढविण्यासाठी ७५ वर्षांची वयोमर्यादा ठेवली आणि त्याची कठोर अंमलबजावणीही केली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॅ. मुरली मनोहर जोशी यांच्यापासून ते सुमित्रा महाजन यांच्यापर्यंतच्या अनेक ज्येष्ठांना तिकिटे नाकारली आहेत.
एकेकाळी पक्ष चालविणारी ही मंडळी ‘आता उरलो मार्गदर्शनापुरता..’ अशा अडगळीत आहेत. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकून पक्षाने आता तोच फॅर्म्युला संघटनात्मक निवडीमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे.