ठाकरे-पवार सरकारवर मराठा संघटनांची तीव्र नाराजी; ‘सारथी’ बंद पाडण्याचे कारस्थान

राज्यभरात निघालेल्या अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन देवेंद्र  फडणवीस सरकारने मराठा तरुणांच्या प्रगतीसाठी सारथी या संस्थेची स्थापना केली होती. मराठा तरुणांना व्यावसायिक तसेच स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक शिक्षण देणे, शिष्यवृत्या देणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आदी कामे सारथी संस्था करत होती. त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जात होता. मात्र उद्धव ठाकरे-अजित पवार नेतृत्वातील महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सारथी संस्था बंद पाडण्याचे कारस्थान केले जात असल्याचा मराठा संघटनांचा आरोप आहे. 


विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठा तरुण-तरुणींच्या हितासाठी सुरु झालेली सारथी संस्था बंद पाडण्याचे कारस्थान राज्य सरकार करत आहे. या सरकारमधल्या मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी, या शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सारथी संस्था वाचवण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ तसेच मराठा समाजाच्या अन्य संघटनांनीही सारथी संस्थेसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे महाआघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून सारथी संस्थेला निधी न देणे, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न करणे, संस्था चालवण्यासाठी पूर्ण वेळ अधिकारी न नेमणे असे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. पगार न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दिली आहे. तसेच मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधीही स्थगित आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा तरुण-तरुणींच्या हितासाठी बार्टी, यशदा या संस्थांच्या धर्तीवर सारथी या स्वायत्त संस्थेची स्थापना केली होती.


मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेली सारथी संंस्था बंद करण्याचा डाव शासनाचा आहे. गेल्या सात-आठ महिन्यात शासनने केवळ वेगवेगळी आश्वासनेच दिली. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही. इतर सर्व संस्थांना कोरोना काळात देखील मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना सारथी संस्थेचा निधी मात्र काढून घेण्यात आला. यामुळे शेकडो मराठा मुलांना मिळालेल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. सरकारची सारथी संस्थेबाबतची भूमिका केवळ बोलाची कढी बोलाचाच भात ठरत आहे.

ठाकरे-पवार सरकार आल्यानंतर ‘सारथी’ संस्थेची स्वयत्ता काढून घेण्यात आली. तेव्हापासून मराठा संघटना सातत्याने सरकारदरबारी हा प्रश्न मांडत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुण्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी पुण्यात येत सारथी संस्थेला भेट दिली. मात्र याहीवेळी त्यांनी ठोस आश्वासन न दिल्याने मराठा संघटना नाराज आहेत. सारथी संस्था बंद करणार नाही, असे सांगणाऱ्या वडेट्टीवार यांनी आर्थिक तरतुदीबद्दल मात्र सोईस्कर मौन पाळले. त्यामुळे राज्य शासन दुटप्पी भूमिका घेत असल्याची मराठा संघटनांची भावना झाली आहे.

वडेट्टीवर यांच्या सारथी भेटीनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर भूमिका मांडताना म्हटले की, ‘मराठा समाजाने संघर्ष करुन मिळवलेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे. याबाबत प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जाते. फक्त आश्वासने देऊन ही संस्था बंद पाडण्याचा विचार आहे का? तसे असेल तरीही सांगा, या शब्दात छत्रपतींनी ठणकावले आहे. आता सारथीचे पंख छाटण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सारथीबाबत समाजाला जे पाहिजे तेच होईल. राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणे, हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे सारथीच्या स्वायतत्तेसाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र यावे, असे आवाहन छत्रपतींनी केले आहे.

खोटं बोला, रेटून बोला हाच ठाकरे-पवार सरकारचा कार्यक्रम असल्याची टीका मराठा सेवा संघाने केली आहे. संघाचे कार्याध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, ”सारथी संस्थेबाबत महाआघाडी सरकारने आता पर्यंत वेळोवेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. याउलट संस्था बंद कशी पडेल यासाठीच अधिक प्रयत्न सुरु आहेत. मिडीयासमोर मात्र या सरकार मधील सर्व मंत्री रेटून खोटं बोलतात. आता मराठा समाज शांत बसणार नाही. यापुढे केवळ मुख्यमंत्र्यांशीच आम्ही चर्चा करु. यातून मार्ग न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करु.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*